१ महिन्यापूर्वी पुलवामा इथे दहशतवादी हल्ला झाला आणि हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायच्या आतच पाकिस्तानशी युद्ध पुकारण्याच्या मागणीने जोर धरला. संपूर्ण पाकिस्तान बेचिराख करा. पाकिस्तानचे सैनिक मारा. ह्युमन राईट्स वगैरे काही पाहू नका. भारतातील पुरोगामी लोकांना पकडून मारा. --- अशी एक ना अनेक माथेफिरू विधाने केली फेसबुक व्हाट्सऍप वर दिसली. राजकीय नेतेदेखील त्यात मागे नव्हते. पुढे मोदी सरकारने बालाकोट या पाकिस्तान मधील ठिकाणी रात्री ३ वाजता हल्ला केल्याचे जाहीर केले आणि छाती बडवून घेतली. त्या कारवाईतून भाजपासाठी राजकीय फायदा सोडला तर भारता साठी काय निष्पन्न झाले सांगणे कठीण आहे.
त्यानंतर जी लुटुपुटुची लढाई झाली तीसुद्धा क्लेशदायक होती. आपल्या जनतेसाठी पाकिस्तानला सुद्धा काहीतरी "कारवाई" करणे भाग होते परंतु त्यांना युद्ध नको होते (जसे ते भारताला नको आहे). त्यामुळे त्यांनी हल्ला केल्यासारखे केले आणि परत फिरले. भारतीय विमाने परत फिरलेल्या पाकिस्तानी विमानाच्या मागे धावली आणि त्यात दोन्ही देशांनी एक एक विमान गमावले. त्याहून वाईट असे कि या सर्व गदारोळात बहुधा फ्रेंडली फायर मध्ये भारतीय विमानांनी आपलेच एक हेलिकॉप्टर पाडले. भारतात त्याची जास्त चर्चा दिसत नाही.
ही लढाई लुटुपुटुची आहे कारण दोन्ही देशांना आपापल्या सामर्थ्याची कल्पना आहे. भारत पाक यांनी आतापर्यंत चार युद्धे केली.१९४८ चे अप्रत्यक्ष युद्ध वगळता इतर सर्व युद्धे ३ महिन्यांच्या आत संपली सुद्धा. आणि त्याचे कारण हेच कि युद्धे लढण्यासाठी आर्थिक ताकद लागते ती दोन्ही देशांकडे कधीच नव्हती. दारूगोळाच संपला तर युद्ध कसे करणार? आज देखील परिस्थिती वेगळी नाही. यामध्ये पाकिस्तान पेक्षा भारताचे जास्त हसे आहे कारण आपण पाकिस्तान पेक्षा १० पटीने मोठे आहोत आणि तरीही आपण मुर्खासारखे पाकिस्तानशी शत्रुत्व चालू ठेवले आहे.
हे शत्रुत्व कुठे आणि कसे निर्माण झाले? पाकिस्तान दहशतवादाचे मूळ आहे कि नुसतेच ओझ्याचे गाढव आहे? जर दशतवादाचे मालक वेगळे असतील तर भारत त्याबद्दल काहीच का बोलत नाही? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतील.
काश्मिरी दहशतवादाचे मूळ
काश्मीर प्रश्न १९४८ पासून अस्तित्वात असला तरीही काश्मिरी दहशतवाद १९८९ पासून सुरु झाला. अफगाणिस्तान मध्ये रशिया ने फेब्रुवारी १९८९ मध्ये माघार घेतली आणि तेथील अमेरिकेच्या पाठिंब्याने लढत असलेल्या मुजाहिदीन आणि तालिबान चा रोजगार संपला. रशियाविरुद्ध च्या लढ्यात जिहाद उर्फ धर्मावर आधारित युद्ध करण्याची मानसिकता अफगाणिस्तानात निर्माण केली गेली होती. अमेरिकेच्या पाठिंब्याने सत्तेत आलेल्या झिया उल हक या पाकिस्तानी हुकूमशाहाने तालिबान चा भस्मासुर उभा केला होता. रशिया ने माघार घेतल्यावर हे सर्व तालिबान काश्मीर मध्ये घुसले आणि तेव्हापासून काश्मीर प्रश्न हा नुसताच प्रश्न न राहता हिंसक बनला. १९८९ मध्ये त्यांना मिळालेली शस्त्रे नि:संशयरित्या अफगाणिस्तानातून आली होती. परंतु खरा प्रश्न हा आहे कि आज ३० वर्षानंतर काश्मीर मध्ये दहशतवादाला मदत कुठून होते. पाकिस्तान किंवा भारत दोन्ही देशांकडे आर्थिक ताकदच नाही तर दूरदृष्टी सुद्धा कमी आहे. त्यात भ्रष्टाचाराची भर असल्यामुळे अश्या पद्धतीने अतिरेक्यांना मदत करण्याचा भरीव कार्यक्रम राबवणे पाकिस्तानला या जन्मात शक्य नाही.
स्वतःला पुरून दुसऱ्याला विकत येईल इतकी अस्त्रे निर्माण करणारे ४ च देश जगात आहेत - अमेरिका, रशिया, युके, आणि चीन. याव्यतिरिक्त सौदी अरेबिया हा एक क्रूर हुकूमशाही पद्धतीने चालणारा देश आहे. त्यामुळे दहशतवादाचा मालक किंवा वाहक होण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु भारतीय नेतृत्वाकडे या शस्त्रांचे मूळ कुठे आहे हे शोधून काढण्याचे धैर्य नाही आणि राजकीय इच्छा शक्ती नाही.
पाकिस्तान आणि दहशतवाद
भारतीयांच्या दृष्टीने पाकिस्तानने अनेक दहशतवादी गोष्टींना सक्रिय पाठिंबा दिला आहे. मुंबई बॉम्ब स्फोट (१९९३), ताज वरील हल्ला (२००८), जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, jklf अश्या संघटना दिलेला पाठिंबा अश्या अनेक घटनांमागे पाकिस्तान असल्याचे नि:संदिग्धपणे दिसले आहे. इतकेच नव्हे तर शीख अतिरेक्यांना देखील पाकिस्तान ने मदत केली आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादी देश असल्याची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे.
पाकिस्तानी राज्यकर्त्यांना भारताची कायमच भीती वाटत आली आहे. भारत पाकिस्तानच्या १० पट मोठा देश आहे. १९४७ च्या फाळणीचे शल्य मनात असल्यामुळे भारताची भूमिका पाकिस्तानला अनुकूल कधीच नव्हती. १९७१ मध्ये बांगलादेश पाकिस्तान पासून स्वतंत्र करून भारताने पाकिस्तान ला मोठा धक्का दिला. पुन्हा भारताशी उघड युद्ध करणे आणि जिंकणे शक्य नसल्यामुळे पाकिस्तान ने छुप्या युद्धाचा (अर्थ दहशतवादाचा मार्ग निवडला) आणि पंजाब आणि काश्मीर मध्ये दहशतवादाला पाठिंबा दिला.मगाशी म्हटल्याप्रमाणे नैतिक पाठिंबा वाटेल तितका देता येतो .. परंतु पैसे आणि शस्त्रे पुरवणे येरागबाळ्याचे काम नाही. पाकिस्तान मध्ये ती ताकद अमेरिका, सौदी, आणि चीन यांच्याशी झालेल्या मैत्रीतून आली. परंतु त्या ३ देशांशी टक्कर घेणे भारताने आजतागायत टाळले आहे,
पाकिस्तानची निर्मिती आणि बागुलबुवा
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने रशियाची धास्ती घेतली. परंतु १९६० च्या सुमारास u2 या अतिउंच टेहळणी करणाऱ्या विमानांच्या साहाय्याने अमेरिकेला रशिया ची खरी ताकद कळून आली. रशिया मध्ये पुरेसे अन्न धान्य सुद्धा होत नसे. त्यामुळे अमेरिकन तज्ज्ञांच्या लक्षात आले कि रशिया अमेरिकेची बरोबरी करू शकत नाही. परंतु तरीही रशिया चा बागुलबुवा अमेरिकेने १९९० पर्यंत कायम ठेवला. याचे कारण असे कि रशिया ची भीती वाटून अमेरिकेने खाजगी कंपन्यांना शस्त्रे उत्पादन करण्याची मोठं मोठी कंत्राटे दिली होती. जर रशियाची भीती नाही राहिली तर त्यांचा धंदा बराच कमी झाला असता.
भारत आणि पाकिस्तान चे काहीसे तसे आहे. पाकिस्तानची निर्मिती आणि त्यानंतरचा बागुलबुवा हा सर्व कृत्रिम आणि दुर्दैवी प्रकार आहे. मते मिळवण्यासाठी उपयुक्त असला तरीही या बागुलबुव्यामुळे भारताचे अतिशय नुकसान झाले आहे.
भारत सोडून जाताना एकसंघ भारत मागे सोडने इंग्रजांच्या हिताचे नव्हते. त्यामुळे भारत सोडताना इंग्रजांनी भारताची फाळणी केली. इतकेच नव्हे तर भारताची सत्ता त्यांनी स्थानिक राजांकडे न सोपवता आपण निर्माण केलेल्या कृत्रिम राजकीय व्यवस्थेकडे सोपवली. काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोन्ही पक्ष ब्रिटिश धार्जिणे होते. दोन्ही पक्षांचे नेतृत्व हे ब्रिटिश धार्जिणे आणि श्रीमंत किंवा कारकून स्तरातील होते. स्थानिक राजे मात्र त्यात क्वचितच होते. इंग्रजांच्या आधी भारतावर मुस्लिम सत्ता असल्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिमांना सत्तेत योग्य स्थान मिळावे असा मुस्लिमांचा आग्रह होता. तर काँग्रेसच्या नेत्यांना मुस्लिम स्पर्धा नको होती. नेहेरूंनी त्रिस्तरीय राज्ययोजना भारत एकसंघ राहणार नाही अशी भीती वाटते म्हणून नाकारली, परंतु त्यांनी भारताची ३ शकले मात्र मान्य केली यातच नेहेरु आणि काँग्रेमधील हिंदू नेत्यांची मानसिकता स्पष्ट होते. त्यामुळे पाकिस्तान निर्माण करण्यात काँग्रेसच्या हिंदू नेत्यांचा मोठा हात आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अश्या प्रकारे पाकिस्तानची निर्मितीच कृत्रिम आहे हे दिसून येते.
शेजारी आणि भाऊ
पाकिस्तान केवळ आपला शेजारी नाही तर भाऊ आहे. पाकिस्तानचे आणि भारताचे हित आणि अहित एकमेकांना जोडलेले आहे. काही शे / हजार / किंवा लाख अतिरेकी म्हणजे संपूर्ण काश्मीर किंवा संपूर्ण पाकिस्तान नाही. काही लोकांच्या चुकीसाठी संपूर्ण समाज, राज्य किंवा देशाशी शतृत्व घेतात ते देश कधीही साम्राज्य उभारू शकणार नाहीत. जर्मनी आणि इंग्लंड मध्ये इतके मोठे युद्ध होऊन हजारो लाखो सैनिक मृत्यू पावले तरीही इंग्लंड ने दोष हिटलर ला आणि त्याच्या नाझी संघटनेला दिला. संपूर्ण जर्मन लोकांना नाही. अमेरिका सुद्धा अतिशय सूक्ष्म रित्या शत्रूला संबोधते. उदाहरणार्थ इराक मध्ये सद्दाम, अफगाणिस्तान मध्ये तालिबान आणि अल-कायदा. अमेरिकन सरकार कधीही शत्रूला मोठे व्यासपीठ देत नाहीत. आणि त्यातच शहाणपण आहे.
या सर्व दहशतवादात पाकिस्तानचे देखील अतिशय नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न २००८ नंतर भारताच्या बरेच मागे पडले आहे. २००१-२०११ च्या दरम्यान दहशतवादामुळे पाकिस्तानचे ६८ अब्ज डॉलर्स इतके नुकसान झाले आणि ३०००० नागरिक मृत्युमुखी पडले. म्हणजेच भारतापेक्षा पाकिस्तानलाच दहशतवादाची जास्त महागात पडला आहे. पाकिस्तान मधील नेतृत्वाला याची जाणीव होत आहे. इम्रान खान यांची सध्याची वक्तव्ये अतिशय समंजस आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तान सह दहशतवादाविरुद्ध लढण्याची भूमिका घेतली तर त्यातूनच दोन्ही देशांचे भले होईल.
भारत आणि पाकिस्तान यांचे मूळ एकच आहे आणि संस्कृती एकच आहे. दोन वेळा एकमेकांना बेचिराख करून आज इंग्लंड आणि जर्मनी एकमेकांशी मित्र होऊ शकतात आणि अणू बॉम्ब टाकूनही आज अमेरिका आणि जपान मित्र होऊ शकतात तर भारत आणि पाकिस्तान नक्कीच १९४७ पासून चुकीच्या मार्गावर गेलेले राजकारण विधायक मार्गावर आणू शकतील.
काश्मीर प्रश्नावरील एक तोडगा
१९४७ पासून काश्मीर समस्या धुमसत आहे. ती अशीच धुमसत राहणे भारताच्या हिताचे नाही आणि पाकिस्तानला पूर्णपणे नष्ट करता येणार नाही आणि केले तरीही काश्मीर प्रश्न सुटणार नाही कारण त्यांना मदत केवळ पाकिस्तान नाही तर अजून कुठून तरी येते आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ पाकिस्तान च्या सहकार्यानेच काश्मीर प्रश्न सोडवता येईल ही वस्तुस्थिती आहे. माझ्या मते खालील पद्धतीने तो सुटू शकेल.
1. पाकिस्तान आणि भारत यांनी एकत्रितपणे संपूर्ण काश्मीर सांभाळावा.
2. काश्मिरी लोक भारत आणि पाकिस्तान दोन्हीचे नागरिक असावेत. भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना काश्मीर मध्ये हवे तसे जाण्याची, राहण्याची आणि काम करण्याची मुभा असावी.
3. काश्मीर स्वतः:चा कारभार स्वतः: सांभाळावा ... अपवाद फक्त परराष्ट्र संरक्षण असावा. या दोन्ही गोष्टी भारत आणि पाकिस्तान ने एकत्रित रित्या कराव्यात.
4. भारत आणि पाकिस्तान ने एकमेकांच्या अखंडतेची शपथ घ्यावी आणि इतर कोणाला काश्मीर मध्ये थारा देऊ नये. त्यानुसार त्यांनी एक कायदेशीर, राजकीय आणि सुरक्षा विषयक चौकात आणि आराखडा तयार करावा.
5. ५० वर्षानंतर काश्मीरी लोकांना हवे असेल तर स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेऊन द्यावे.
अश्या प्रकारे काश्मीर मध्ये शांतता तर प्रस्थापित होईलच परंतु भारत आणि पाकिस्तान आपल्या सर्व शेजारी राष्ट्रांसोबत समृद्धी आणि सौहार्द निर्माण करण्याचा एक नवा प्रयोग करू शकतील.