Announcement

Collapse
No announcement yet.

पुरोगामी विचारांचे महत्व

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • पुरोगामी विचारांचे महत्व

    संक्षिप्त
    इंग्रजांनी डावललेया मराठी नेतृत्वाने स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा पुढे चालवत महाराष्ट्र राज्य भारतात सर्वात प्रगत केले. जात पात धर्म आणि अंधश्रद्धांचे प्राबल्य असलेली राज्ये भारतात मागे राहिली. संपूर्ण जगात पुरोगामी आणि उदारमतवादी विचारसरणीची राष्ट्रे प्रगत आहेत. भारताला प्रगत बनवायचे असेल तर महाराष्ट्राचा पुरोगामी आणि उदार विचार संपूर्ण भारतात पोचवला पाहिजे.

    महाराष्ट्राची प्रगती आणि त्याचे रहस्य
    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र भारतात सर्वाधिक प्रगत राज्य बनले. या प्रगतीचे रहस्य दुसरे तिसरे काही नसून, ७००-८०० वर्षांचा पुरोगामी संत सुधारक आणि मराठी साम्राज्याचा वारसा लाभलेल्या मराठी माणसांमध्ये आहे.

    इंग्रजांच्या काळात त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांना डावलून स्वतः:चे स्थान बळकट करण्यासाठी कारकून व्यवस्था निर्माण केली. भारतातून निघून जाताना सुद्धा इंग्रज भारतातील सत्ता ही स्थानिक राज्यांकडे येणार नाही याची काळजी घेऊन गेले. परिणामी पंत प्रधान मुख्यमंत्री इथपासून ग्राम पंचायतीपर्यंत इंग्रज धार्जिणे नेतृत्व भारतात राहिले.

    महाराष्ट्र मात्र मोठा अपवाद ठरला. मराठी साम्राज्य १८१८ मध्ये जरी लयास गेले तरीही त्याचा वारसा जिवंत असल्याचा प्रत्यय स्वातंत्र्यानंतर लगेच आला. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात लोकनेत्यांची नाळ रुजली आणि पुढे मराठा, वंजारी, मुस्लिम आणि दलित नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आले. इंग्रजांच्या काळात डावलले गेलेल्या मराठी नेतृत्वाने लोकांच्या हिताचे निर्णय राबवत महाराष्ट्र राज्य प्रगत केले.

    महाराष्ट्राने राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव असे प्रशासनाचे आणि आर्थिक व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण केले. कोयनेसारख्या मोठ्या योजना आखल्या आणि राबवल्या. कृषी विद्यापीठे स्थापन केली आणि शेती मध्ये क्रांती आणली. सिंचनातून दुष्काळी जिल्ह्यांचा उद्धार केला. सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले. खेडोपाडी रस्त्यांचे जाळे विणून आणि राज्य परिवहन मंडळामार्फत ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थांची नाळ जोडली. औद्योगिक प्राधिकरणांच्या द्वारे प्रगत औद्योगिकरण केले. सिकॉम सारख्या निम-सरकारी संस्था स्थापन करून परदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रात रुजवले.

    महाराष्ट्राच्या प्रगतीत महाराष्ट्र पोलिसांचा मोठा सहभाग आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या तोडीचे समजले जाणाऱ्या मुंबई पोलीस आणि एकंदरीतच महाराष्ट्र पोलीस यांनी सुरक्षा आणि न्याय चांगला राखल्यामुळेसुद्धा महाराष्ट्र ही प्रगती करू शकला. अमेरिकेत पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीला डोळ्यात भरते ती अमेरिकेतील शिस्त आणि सौजन्यशील परंतु कडक पोलीस व्यवस्था. रस्ते इमारती आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व सुखे हे तर आहेच. परंतु अमेरिकेतील पोलीस हा अमेरिकेच्या समाजस्वास्थ्याच्या पाया आहे. तसेच महाराष्ट्रातील पोलीस हे महाराष्ट्राच्या स्वास्थाचा आणि प्रगतीचा आधार आहेत.

    महाराष्ट्राने कुळ कायदा करून लाखो करोडो सामान्य लोकांना त्यांच्या जगण्याचा हक्क मिळवून दिला. कसेल त्याची जमीन हे तत्व प्रत्यक्षात आणले. विनोबा भावे यांनी देखील भूदान चळवळ राबवून मोलाचे योगदान दिले. संपूर्ण भारतात अश्या पद्धतीने सामान्य लोकांना हक्क मिळवून देणारे महाराष्ट्राच्या तोडीचे कार्य बंगालमध्ये ज्योती बसू आणि केरळमध्ये नंबुद्रिपाद यांच्याव्यतिरिक्त कोणीही केले नाही. बिहार मध्ये सर्वात कमी जमीन सुधारणा झाल्या मुले तिथे जमीनदारी अजूनही कायम आहे आणि परिणामी समाजामध्ये दारिद्र्य आहे. पाकिस्तानमध्ये तर शून्य जमीन सुधारणा झाल्या. आणि त्यामुळे तिथे दोनच वर्ग आहेत. गरीब आणि श्रीमंत. मध्यमवर्ग कधी अस्तित्वतातच आला नाही. अजूनही पाकिस्तानमध्ये मध्यमवर्ग जेमतेम १०% आहे. भारतात ४०-५०% आहे आणि महाराष्ट्रात ६०-७०% आहे.

    महाराष्ट्राला केवळ राजकीय च नाही तर सामाजिक नेतृत्व देखील चांगले लाभले आहे. संत, सुधारक आणि अस्वस्थ कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रात सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यापासून सुरु झाली आणि आधुनिक काळात गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे, फुले, आंबेडकर, इतकेच काय तर आमटे आणि अण्णा हजारे यांच्या रूपाने जिवंत आणि प्रवाही राहिली. परिणामी मराठी समाज बव्हंशी समानते ला मानणारा आणि उदारमतवादी आहे.

    कायदा सुव्यवस्था न्याय, जमीन सुधारणांमुळे आणि सहकार चळवळीमुळे अस्तित्वात आलेला मध्यमवर्ग आणि पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र संपूर्ण भारतीयांना आकर्षक नाही वाटला तरच नवल. इतर राज्यातून धडपड करणारे लोक इथे येऊन महाराष्ट्राच्या संपत्तीमध्ये अधिकच भर पडत गेली.

    महाराष्ट्र आणि अमेरिकेतील साम्ये
    अमेरिकेत आणि महाराष्ट्रात अनेक साम्ये आहेत. स्वातंत्र्यप्रिय, धर्मनिरपेक्ष, न्यायी, कष्टाळू, प्रामाणिक माणसे जशी जगाच्या तुलनेत अमेरिकेत जास्त दिसतात तशी भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त दिसतात. अमेरिकेत जसे जगभरातून लोक येतात आणि स्वतः:ची प्रगती साधतात तसेच महाराष्ट्रात भारतभरातून लोक येऊन स्वतः:ची प्रगती साधू शकतात. अमेरिकेत जात पात अंधश्रद्धांचे प्रमाण कमी आहे. तसेच महाराष्ट्रात आहे. अमेरिकेतील राजकारणी लोक पक्षापेक्षा स्वतः:च्या मतदारसंघाशी जास्त संलग्न असतात. भारतात महाराष्ट्र यात अग्रगण्य आहे असे म्हटल्यास नवल नाही.

    उर्वरित भारताची अवस्था
    अर्थात महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण भारत नाही. उरलेल्या भारतावर अजूनही जातपात धर्म आणि अंधश्रद्धा यांचा मोठा पगडा आहे. कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक न्याय खूप मागे आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षण आणि कुशल मनुष्यबळ कमी आहे. म्हणून संपत्ती निर्माणाचे प्रमाण कमी आहे आणि जी काही निर्माण होते त्यात देखील भ्रष्टाचार आणि विषमतेमुळे घट होते. दुर्दैवाने महाराष्ट्रानेच सुचवलेल्या आर्थिक व्यवस्थेमुळे, संपन्न राज्यांची संपत्ती ही भारतात केंद्रामार्फत गरीब राज्यांकडे वळवली जाते आणि तिथे भ्रष्टाचाराला बळी पडते. उदाहरणार्थ बिहारमधील चारा घोटाळा. तीच संपत्ती जर महाराष्ट्रात राहिली असती तर महाराष्ट्र अधिक श्रीमंत झाले असते आणि बिहार सारख्या राज्यात कमी घोटाळे झाले असते आणि तिथल्या राजकारणी लोकांचा भारतीय राजकारणावर कमी पगडा असला असता.

    एकूणच काय तर महाराष्ट्राची प्रगती दिशादर्शक असली तरीही अपुरी आहे. संपूर्ण भारताला प्रगत करण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे ज्या पुरोगामी विचारांमुळे आणि आचारांमुळे महाराष्ट्र प्रगत झाला ते विचार भारतभर पसरवणे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य मराठी नेतृत्वाने चालवले, ती पद्धत इतर राज्यात अमलात आणणे.

    लॉ ऑफ रिग्रेशन
    दुर्दैवाने महाराष्ट्रातील चांगले विचार भारतभर पसरण्यापेक्षा आता महाराष्ट्राचेच राजकारण आणि समाजकारण आता घसरणीला लागलेले दिसते.

    माहिती अधिकार, कुल कायदा करणारा पुरोगामी महाराष्ट्र राज्य, "गाय हा उपयुक्त पशु आहे" हे सावरकरांचे शब्द विसरून "गोवंश हत्या प्रतिबंध" सारखा प्रतिगामी कायदा करू लागला आहे.

    संख्याशास्त्र (अर्थात स्टॅटिस्टिकस) मध्ये लॉ ऑफ रिग्रेशन म्हणजे प्रतिगामनाचा नियम आहे. या नियमानुसार असाधारण वृत्ती कमी होऊन साधारण वृत्ती वाढीस लागणे हा निसर्गनियम आहे. महाराष्ट्राची प्रगती ही भारताच्या तुलनेत असाधारण आहे. परंतु जाणीवपूर्वक प्रयत्न नाही केले तर संपूर्ण भारत महाराष्ट्रासारख्या होण्यापेक्षा महाराष्टराचे राजकारण समाजकारण आणि पर्यायाने प्रगती ही उर्वरित भारतासारखी होईल.
Working...
X