Announcement

Collapse
No announcement yet.

हिंदुत्ववाद सोडून मी पुरोगामी कसा झालो ?

Collapse
X
 
  • Filter
  • Time
  • Show
Clear All
new posts

  • हिंदुत्ववाद सोडून मी पुरोगामी कसा झालो ?

    हिंदुत्ववाद सोडून मी पुरोगामी कसा झालो
    --------------------------------------------------------

    एका शब्दात सांगायचे तर "अमेरिकेमुळे"!

    अमेरिका भांडवलवादी आहे हे आपण सर्वानाच माहित आहे परंतु अमेरिका पुरोगामी आहे हे खूप कमी जणांना माहित असते. या लेखात मी तुम्हाला मी भारतात असताना हिंदुत्ववादाच्या चळवळीत बराच सक्रिय सहभाग घेतला तेव्हापासूनचा अमेरिकेत आल्यानंतर माझा प्रवास पूरोगामी विचारांकडे कसा झाला हे थोडक्यात सांगतो.

    मी पुण्यात जन्मलो आणि वाढलो. नूमवि, फर्गसन, पुणे विद्यापीठ इथे शिक्षण झाले. नूमवि तुन दहावी झाल्यापासून पुणे विद्यापीठातून MCA पदवी प्राप्त करेपर्यंत मी पुण्यातच होतो. त्या काळात मी स्वरूप वर्धिनी या संघ परिवारातील "शैक्षणिक" संस्थेचे मन लावून काम केले. स्वरूप वर्धिनी हि संस्था पुण्याच्या पूर्व भागातील विकासाच्या संधी नसलेल्या विद्यार्थ्यांना विकासाच्या संधी मिळाव्या म्हणून १९७९ साली स्थापन झाली. संस्थेचे प्रमुख संस्थापक कृष्णराव उर्फ किशाभाऊ पटवर्धन हे संघाचे जुने प्रचारक आणि हेडगेवारांचे शिष्य होते. पुण्यात रास्ता पेठेत राजा धनराजगिरजी शाळेतुन मुख्याधापक म्हणून निवृत्त झाल्यावर किशाभाऊंनी संस्था स्थापन केली. संघ आणि संघ विचार यांना पुण्यात सदाशिव पेठेत सुद्धा त्या काळात फारसे स्थान नव्हते. पुण्याच्या पूर्व भागात (सोमवार मंगळवार कसबा आणि रास्ता पेठ ) इथे संघाचे अस्तित्वच नव्हते. परंतु शिक्षण हे गाजर दाखवत किशाभाऊंनी संघ विचार पुण्याच्या पूर्व भागात रोवले. त्याला बरा प्रतिसाद मिळाला सुद्धा. संस्थेत ५ वि ते १० वि च्या मुलांना गणित विज्ञान आणि इंग्रजी असे तीन विषय शिकवत, सुटीत शैक्षणिक शिबिरे होत आणि वर्षभर संघ विचारांकडे झुकणारे वेगवेगळे वक्ते व्याख्याने देत.

    पुढे संस्थेचे हे शैक्षणिक स्वरूप हळूहळू निश्चित पणे हिंदुत्ववादाकडे झुकले. मी दहावी झाल्यावर १९८७ पासून नियमित पणे संस्थेत जाऊ लागलो. त्या काळात १० वि झालेली फक्त २०-२५ मुले संस्थेत होती. आमचे काम मुख्यतः ५ वि ते १० वि च्या इतर मुलांना शिकवणे त्यांचे खेळ घेणे हे होते. किशाभाऊंचे व्यक्तिमत्व उत्साही, प्रेमळ, प्रसंगावधानी आणि नर्मविनोदी होते. संघाच्या इतर लोकांच्या तुलनेत किशाभाऊ अतिशय व्यवहारी आणि क्रांतिकारी होते. पण त्यांचा गाभा मात्र कट्टर हिंदुत्ववादी होता. शिक्षणाच्या नावाखाली बहुजन आणि विशेषतः मराठेतर समाजात हिंदुत्वाच्या विचारांचा शिरकाव करणे हे त्यांचे खरे ध्येय होते. त्यांचे ते ध्येय राम मंदिराच्या अनपेक्षित यशामुळे कल्पनेच्या पलीकडे यशस्वी झाले आणि संघ विचार पुण्याच्या पूर्व भागात हळू हळू रोवले गेले.

    १९८७ साली पुण्यात दोनच शाखा होत्या. रामकृष्ण आणि विवेकानंद. सुरुवातीला मी आणि माझे सहकारी मित्र आम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या. गणित इंग्रजी विज्ञान यांना आम्ही अनेक उपक्रमांची जोड दिली. आय आय टी च्या पारसनीस नावाच्या प्राध्यापकांनी निर्माण केलेले सोपे आणि स्वस्त विज्ञान प्रयोग, सह्याद्रीत भटकंती, मुलांना व्यावहारिक शिक्षण , प्रोजेक्ट बेस्ड गटात काम करायचे शिक्षण अश्या विधायक गोष्टीं केल्या.

    परंतु १९८९ ला राममंदिर आंदोलन सुरु झाले आणि तेव्हापासून संस्थेने हिंदुत्ववाद सुरुवातीला हळुवारपणे आणि नंतर अगदी उघडपणे स्वीकारला. संस्थेचे आणि संघाचे संबंध हळू हळू घट्ट होत गेले. मी सुद्धा त्याकडे आकर्षीत झालो. आणि त्यातूनच मी आणि माझे दोन मित्र अयोध्येला १९८९ ला शिलान्यासाला गेलो. त्यानंतर मी पुन्हा १९९१ ला काश्मीर ला गेलो आणि १९९२ ला पुन्हा एकदा अयोध्येला गेलो तेव्हा बाबरी मशीद पडली गेली त्याचा मी साक्षीदार आहे.

    किशाभाऊ ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या कामाला उंदराचा चावा म्हणत. उंदीर तुम्ही झोपेत असताना चावतो आणि फुंकर मारतो आणि आपल्याला ते झोपेत कळत नाही असे म्हणत. सकाळी उठल्यावर पाय सुजलेला दिसतो. अश्या अनेक युक्तिवादातून आमची मने हळूहळू हिंदुत्ववादाकडे निर्विवादपणे झुकली गेली.

    हे इतके कि १९९१ ला आम्ही काश्मीर ला तेव्हाच्या भारत जोडो यात्रेला गेलो तेव्हा आमच्या समोरच यात्रेतील कुणीतरी एका मुस्लिम तरुणाला वार करून मारले आणि पुढे तो मेला असे आम्हाला कळले तेव्हा आम्हाला काहीच वाटले नाही. विकृत हिंदुत्वाने आमच्या मनाचा ताबा घेतला होता.

    नाही म्हणायला १९८९ साली अयोध्येतील ते भणंग आळशी गंजाडे साधू बघून मला घृणा वाटली होती. परंतु तरीही १९८९ पासून हिंदुत्ववाद हा देशाला पुढे नेण्याचा मार्ग आहे असे मला वाटू लागले होते. देश म्हणजे माणसे हे विचार मी स्वतः १९८९ च्या संस्थेच्या वार्षिक वृत्तात लिहिले. पण तरीही हिंदुत्ववाद "देश म्हणजे माणसे" मानत नाही हे मला तेव्हा कळले नाही. हिंदुत्वासाठी सांस्कृतिक प्रतीके माणसांपेक्षा जास्त महत्वाची आहेत हे मला त्यावेळी लक्षात आले नव्हते.

    १९८९ पासून संस्थेचे शैक्षणिक कार्य हळूहळू मागे पडून हिंदुत्ववादी कारवाया वाढू लागल्या होत्या. ज्ञान प्रबोधिनीचे यशवंत लेले आम्हाला गुरुसमान होते त्यांच्या सूचनेवरून पुढे मी संस्थेचे पुण्यात (आणि देशात) पहिले भगवे ध्वजपथक बसवले. त्याच सुमारास संस्थेच्या इमारतीच्या उदघाटनाला आलेल्या शंकराचार्यांसमोर मी आणि माझ्या मित्राने (श्रीनंद बापट) शिवतांडव स्तोत्र सादर केले. पुढे ते आम्ही अनेक ठिकाणी सादर केले आणि श्रीनंद च्या सुंदर हस्ताक्षरात त्याच्या प्रति तयार करून लोकांना वाटल्या. अगदी संग्रही असाव्या अश्या त्या प्रति होत्या. अश्या गोष्टींमुळे पूर्व भागात हिंदुत्ववाद अलगद रुजत गेला. पुढे विवेकानंदांचे शिकागो भाषण मी आंणि माझा मित्र मिलींद पुरोहित (सध्या स्वामी देवसेवानंद ) आम्ही ५० शाळेत सादर केले. स्वरूप वर्धिनीची गणपती उत्सवात अनेक पथके नाचू लागली. इतकेच नाही तर आम्ही इतर मंडळांना त्यांची पथके बसवायला मदत केली. एक ना अनेक छोट्या मोठ्या उपक्रमांमुळे पुण्याच्या पूर्व भागात हिंदुत्व स्थिरावले.

    त्यामुळे १९९२ ला बाबरी पडली त्यानंतर पुण्यात कसबा मतदार संघ भाजप कडे जो १९९५ ला गेला तो पुढे २८ वर्षे त्यांच्याकडे टिकला. म्हणूनच परवा धंगेकर यांचा विजय माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. कसबा पुण्याचा राजकारणाचा केंद्र बिंदू आहे आणि पुणे देशाच्या राजकारणाचा केंद्र बिंदू आहे. पुणे हे चळवळीचे शहर आहे आणि हिंदुत्वाची विकृती नष्ट करण्यासाठी पुण्याने हिंदुत्वाचा त्याग करणे अतिशय महत्वाचे आहे.

    हिंदुत्वाच्या लाटेमुळे पुण्याचे वातावरण ढवळून निघाले होते. संस्थेचा त्यातूनच अजूनच विस्तार होत गेला. पुढे आमचा जवळचा मित्र आणि सहकारी ज्ञानेश पुरंदरे याने आपली नोकरी सोडून संस्थेचे काम १९९६ पासून २०२० मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत केले आणि विस्तारले. दुर्दैवाने ज्ञानेश २०२० जुलै मध्ये कोविड ला बळी पडला. काळाच्या ओघात आमची मैत्री कायम राहिली पण विचारात मात्र अंतर पडले. संस्थेने हिंदुत्वाचा इतका उघड प्रचार करणे आणि शिक्षणाला मागे ठेवून राजकीय भूमिका घेणे मला पसंत नव्हते. पण तरीही मी हिंदुत्ववादी च होतो.

    अमेरिकेत मी २००० ला आलो आणि MBA करून हनीवेल नावाच्या कंपनीत काम करू लागलो. अमेरिका हा एक सुंदर देश आहे अगदी स्वप्नवत आहे . अमेरिकेला यायच्या आधी मी ऑस्ट्रेलिया सिंगापुर कोस्टा रिका अश्या देशात जाऊन आलो होतो. पण अमेरिका हा सर्वांपेक्षा अदभूत देश आहे. अमेरिकन माणसे कष्टाळू आहेत आणि व्यवस्था कमालीची प्रामाणिक आहे. कायदे कडक आहेत आणि सरकार स्वच्छ आहे. कितीही गरीब असले तरी सर्वाना परवडेल अशी उत्पादन आणि विक्री व्यवस्था आहे. मला त्याचे कुतुहूल वाटू लागले. भारतात काही गोष्टी या काही लोकांसाठीच असतात आणि आपण सर्वाना त्या सगळ्या उपलब्ध होतील असा विचार कधी करताच नाही. अमेरिकेत तसे नाही. अमेरिकेत कितीही भारी तंत्रज्ञान येवो ... हळूहळू ते अगदी तळागाळातील माणसांना परवडेल इतके स्वस्त होई पर्यंत ते उद्योग थांबत नाहीत. हा केवळ भांडवलवादी विचार नाही तर सर्वांच्या प्रगतीचा विचार आहे. अमेरिकेची स्वातंत्र्य न्याय आणि समान संधी अशी तीन सूत्रे हळूहळू मला समजू लागली. कितीही अब्जाधीश असला तरी प्रत्येक व्यक्ती कायद्यापुढे समान आहे आणि त्यामुळेच अमेरिका प्रगत आहे हे माझ्या लक्षात आले. अब्जाधीश सुद्धा मॅकडोनाल्ड च्या रांगेत उभा राहून बर्गर विकत घेतो आणि दुसऱ्यांचे बेसिक हक्क हिरावून घेत नाही हे मला कळू लागले. आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपीला गुन्हेगार म्हणायचे नसते हे मला समजू लागले. दुसर्या व्यक्तीला नेहेमी आदरपूर्वक वागवायचे. प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा आदर करणे गरजेचे आहे हे मला समजू लागले.

    आपल्याला अमेरिकेची जी समृद्धी दिसते तिचा पाया हा असा मूल्यात्मक आणि संस्थात्मक आहे. न्याय स्वातंत्र्य आणि जात पात धर्म किंवा वंश न पाहता इथे सर्वाना समान संधी दिली जाते. म्हणून देश महासत्ता आहे हे कळले.

    मी हळूहळू हिंदुत्वापासून दूर गेलो पण तरीही हिंदुत्व किती विषारी आहे हे मला अजूनही समजले नव्हते. २०१४ ला मी तरीहि मोदी समर्थक होतो कारण मोदींच्या "सबका साथ सबका विकास " ला मी सुद्धा भुललो होतो. पण तीन गोष्टी अश्या घडल्या कि ज्यामुळे माझ्या विचारांची दिशा पूर्ण बदलली.

    पहिली गोष्ट अशी कि २०१४ ला सत्तेत आल्या आल्या मोदी ने जाहीर केले कि काळा पैसा आणण्याचे जे वचन त्याने लोकांना दिले ते पूर्ण करणे शक्य नाही. ते पाहून माझी ताबडतोड खात्री पटली कि मोदी भंपक माणूस आहे. खोटारडा आहे.

    दुसरी गोष्ट मात्र खूप साधी पण जास्त प्रभावी होती. आमच्या जवळ राहणाऱ्या एका पाकिस्तानी बाई (रशीदा) आणि तिच्या अमेरिकन नवऱ्याशी (टिम) २०१२ साली ओळख झाली. एकदा त्यांच्या घरी गेलो तर तिच्या आई वडिलांना भेटलो त्यांना कोण आनंद झाला. कारण वडील लखनऊ आणि आई नागपूर ची होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षित असूनही चांगल्या नोकऱ्या मिळाल्या नव्हत्या. म्हणून कंटाळून १९६५ साली ते पाकिस्तानला गेले आणि एका मोठ्या सरकारी PSU चे अध्यक्ष म्हणून ३० वर्षानंतर निवृत्त झाले. रशिदाच्या आईला भारतात पुन्हा कधीच येता आले नाही. तिची आई वारली तरी सुद्धा नाही. कारण व्हिसा मिळाला नाही. हे ऐकून मला फार वाईट वाटले. कुठल्याही स्त्रीला तिच्या माहेरी जाता येऊ नये असा क्रूरपणा आपल्या व्यवस्थेत आहे ती व्यवस्था चूक आहे असे वाटू लागले.

    तिसरी गोष्ट अशी कि हिंदुत्ववाद्यांनी दाभोलकर पानसरे कलबुर्गी आणि लंकेश यांचे एकापाठोपाठ खून केले. ते पाहून मला हिंदुत्व अगदीच चुकीच्या मार्गावर गेल्याची जाणीव झाली.

    देश म्हणजे देशातील माणसे. त्यांचा धर्म जात प्रांत दुय्यम असायला हवे. माणसांना सन्मान हवा. सुरक्षितता हवी. कायद्याचे अभय हवे. त्यात जात धर्म प्रांत काही असू नये. २०१४ पासून आजतागायत मोदी ने मला कधीही निराश केले नाही. नोटबंदी, कोविड, सरकारी मालमत्ता विकणे, दिल्लीतील शेतकरी आंदोलन, स्वतःचे सेल्फ प्रोमोशन, लोकशाहीची तोडफोड सगळीकडे मोदीने दाखवून दिले कि तो संघाच्या क्षुद्र आणि नीच विचारसरणीचा वाहक आहे. २०१४ पासून भारतात मुस्लिम द्वेष वेड्यासारखा वाढला आहे. उघडपणे नेते मंडळी उग्र स्वरात मुस्लिम विरोधी बोलतात आणि न्याय आणि पोलीस व्यवस्था काही करत नाहीत हे अतिशय धक्कादायक वास्तव आहे. मोदी हा विकास नाही विष-पुरुष आहे असे मला आज वाटते.

    सध्या भारतात कोणाला तुरुंगात कितीही काळ ठेवले जाते आणि त्यावर न्यायालय गप्प बसते हे धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणा विरोधकांच्या नाड्या आवळण्यासाठी वापरल्या जातात हे धक्कादायक आहे. खोटे आरोप पेरले जातात आणि आर्यन खान ला अटक होते हे धक्कादायक आहे. पी एम केअर सारखा फंड निर्माण केला जातो आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो हे सांगितले जात नाही. त्याच वेळी विरोधी पक्ष फोडले जातात हे धक्कादायक आहे. राज्यपाल आपली जबाबदारी विसरून विकृत विचार मांडू लागतात आणि न्यायालयीन दिरंगाईचा लोकशाही बळी पडते आहे हे भयानक वास्तव बनले आहे.

    हिंदुत्वाचा विषवृक्ष असा हा भारतात प्रचंड फोफावला आहे पण लोकांना तो विषवृक्ष आहे हे कळत नाही असे मला वाटते. कधी कधी वाटते २००४-२०१४ ची भारताची नेत्रदीपक प्रगती सहन न होऊन परकीय शक्तींनी हिंदुत्व भारतावर लादले तर नाही ? महाजन मुंढे पर्रीकर स्वराज जेटली एकापाठोपाठ गेले आणि नड्डा वगैरे अशी नॉन-डिस्क्रिप्ट नावे पुढे आली याचा मला संशय वाटतो.

    हिंदुत्व निष्क्रिय भोन्दुत्व आहे हि माझी जुनीच धारणा आहे. परंतु त्यांचा राष्ट्रवाद चूक आहे हे मला अमेरिकेला आल्यावर कळले. राष्ट्र म्हणजे माणसे. माणसे सुखी होणे म्हणजे राष्ट्र सुखी होणे हे अमेरिकेत मी प्रत्यक्ष अनुभवले. तेव्हा आता कळते आहे कि हिंदुत्व ही केवळ एक विकृती आहे. हिंदुत्व हे भोन्दुत्व आहे.

    मला वाटते भारत एक महान देश आहे आणि एक महान संस्कृती आहे. जग सुद्धा खूप सुंदर आहे. आपण जगाला सामोरे विश्वासाने जायचे असेल तर आपली माणसे सक्षम हवीत. भीती आणि द्वेषाने भरलेली मने जग जिंकू शकणार नाहीत. आपल्याच माणसांना जाती धर्म प्रांतात विभागून जग जिंकता येणार नाही. भारत समृद्ध करायचा असेल महासत्ता करायचा असेल तर राष्ट्र म्हणजे माणसे हे तत्व लक्षात घेतले पाहिजे. माणसे सक्षम समृद्ध सुखी होतील तेव्हाच राष्ट्र सक्षम समृद्ध सुखी होईल. आणि माणसे तेव्हाच सक्षम समृद्ध सुखी होतील जेव्हा आपण अमेरिकेप्रमाणे स्वातंत्र्य न्याय आणि समान संधी सर्वाना उपलब्ध करून देऊ.

    Last edited by Parag; 03-13-2023, 11:04 PM.
Working...
X